Tuesday, November 22, 2011

National Epilepsy Day special awareness programme on 17.11.2011

'मिरगी'बाबत अंधश्रद्धेऐवजी योग्य उपचारांना प्राधान्य द्यावे : छगन भुजबळ यांचे आवाहन

मुंबई, दि. 17 नोव्हेंबर : मिरगी या रोगाच्या बाबतीत अंधश्रद्धेच्या आहारी न जाता योग्य वैद्यकीय उपचारांना नागरिकांनी प्राधान्य द्यावे, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आज सकाळी येथे केले.
राष्ट्रीय मिरगी दिनाच्या (नॅशनल एपिलेप्सी डे) निमित्ताने महाराष्ट्र राज्य आरोग्य सोसायटी, एपिलेप्सी फाऊंडेशन आणि नोवार्टिस यांच्या संयुक्त विद्यमाने आज येथील चर्चगेट स्थानकावर जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानाचे उद्घाटन श्री. भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
मिरगीसंदर्भात जनजागृती अभियानाचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन करून श्री. भुजबळ म्हणाले की, मिरगी या रोगाच्या बाबतीत जनमानसात अनेक अंधश्रद्धा आहेत. भूतबाधा, प्रेतबाधा, दुष्ट शक्तींचा प्रभाव आणि त्याही पुढे जाऊन संबंधित व्यक्तीला वेडे ठरविण्याकडे लोकांचा कल असतो. रोगाच्या निराकरणासाठी अघोरी मार्गांचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे मिरगी आलेल्या व्यक्तीला तातडीचे उपचार म्हणून कांद्याचा, चपलांचा वास देण्याचाही प्रयोग केला जातो. परंतु या सर्व गोष्टी चुकीच्या आहेत. त्याऐवजी योग्य वैद्यकीय उपचारांना लोकांनी प्राधान्य देण्याची गरज आहे. नियमित उपचारांनी हा रोग नियंत्रणात राहतो आणि बराही होऊ शकतो.
सार्वजनिक आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांनीही मिरगीविषयीच्या भ्रामक समजुतींना थारा न देता वैद्यकीय उपचारांनाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन यावेळी केले.
या कार्यक्रमास मुंबई भाजप प्रदेशाध्यक्ष राज पुरोहित, एपिलेप्सी फाऊंडेशनचे डॉ. निर्मल सूर्या, कैलास अग्रवाल, राकेश मेहता आदी उपस्थित होते.